Wednesday, September 12, 2012

adyatm

अंतःसृष्टीच्या ज्ञानास आध्यात्मिक ज्ञान म्हणतात. या क्षेत्रात इंद्रियांना अजिबात शिरकाव नाही; ते बुद्धीनेच होते. अध्यात्म ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान- मी कोण आहे याचे ज्ञान. स्थूल मानाने असे म्हणता येते, की पाश्‍चात्त्य विचारपरंपरेने बाह्य सृष्टीच्या ज्ञानाला म्हणजेच विज्ञानाला महत्त्व दिले. आपल्याकडे अंतःसृष्टीच्या ज्ञानाला म्हणजे अध्यात्माला महत्त्व दिले. आपण बुद्धी अंतर्मुख केली तर तिकडे ती बहिर्मुख झाली. “अध्यात्मविद्या विद्यानां’ असे सांगताना गीतेमध्ये आत्मज्ञानाचेच महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. मी कोण आहे हे समजणे किती कठीण आहे याविषयी तुकोबांचा एक अभंग आहे, “मी हे ऐसी कोण जाती। अवघड किती पाहाता।।’ हे आत्मज्ञान झाले तरी तेही बुद्धीनेच होत असल्यामुळे त्यासाठी बुद्धी शुद्ध व्हायला हवी, असे अध्यात्मज्ञानाचे प्रतिपादन करणारा वेदान्त सांगतो. यालाच ते चित्तशुद्धी असे म्हणतात. विज्ञानाची सुरवात इंद्रिय अनुभवाने होत असल्यामुळे ज्ञानेंद्रिये नीट, निर्दोष असावीत, असे अनुभववाद्यांची ज्ञानमीमांसा सांगते. अशा निर्मळ इंद्रियांना बाह्य सृष्टीचे प्रतिबिंब, तसेच हुबेहूब व म्हणून विश्‍वसनीयरित्या दाखवता येईल. याच पद्धतीने अध्यात्म सांगणारे म्हणतात, की आत्मज्ञानाचे एकमेव साधन असणारी बुद्धी अशीच शुद्ध पाहिजे. अशा बुद्धीला उलगडणारे आत्मस्वरूप म्हणजे “मी’चे रूप कसे असेल? व्यवहारामध्ये मी ज्ञाता, कर्ता आणि भोक्ता या रूपांत वावरतो. मी काही एक विषय जाणतो, काही एक कर्म करतो आणि (त्या कर्माच्या) फळाचा उपभोग घेतो. वेदान्ताच्या एका शाखेचे म्हणणे असे आहे, की आत्मरूप हे शांत, अविचल आहे; ते काही करीत नाही वा भोगतही नाही. तथापि मी कर्ता आहे वा भोक्ता आहे ही मिथ्या जाणीव म्हणजेच अहंकार, त्यात निर्माण होतो त्याचे कारण देहादी अनात्मवर्गाशी त्याने अविद्येच्या प्रभावामुळे साधलेले तादात्म्य. देहादी अनात्म वर्ग हा पूर्णपणे जड आहे. त्याच्याशी तादात्म्य पावून त्याचा अभिमान धरू नये. मी अमूक करतो, मी अमूक भोगतो असे वाटू लागते, हाच बंध होय. त्यातून सुटका म्हणजे मोक्ष. हा मोक्ष मी या अनात्मरूप जडापेक्षा भिन्न आहे. यालाच आत्मानात्मविवेक असे म्हणतात आणि हा विवेक बुद्धीच्या यो